12 वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराचं अपहरण, दारू पाजत दगडाने ठेचून खून, पुण्यात चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात हेवन पार्क सोसायटी रोडवरील १२ वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन केल्याचा प्रकार खंडणीच्या कारणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोंढवा पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणून चौघांना ताब्यात घेऊन वानवडी पोलिसांचा ताब्यात देण्यात आल्या.

रोहित गौतम बनसोडे (वय २७, रा. उंड्री) अजय विजय गायकवाड (वय २२, रा. कृष्णानगर, महंमदवाडी रोड) श्रीकांत भिमराव साठे (वय २०, रा. कृष्णानगर), अक्षय अनिल जाधव (वय २०, रा. आझादनगर, वानवडी) अशी त्यांची नावे आहेत. अझान झहीर अन्सारी (वय १२ वर्ष, रा. शिवनेरी, कोंढवा खुर्द) असे खुन झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार १० जुलै रोजी उघडकीस आला होता.

जंगलाचा भाग असल्याने खुनाविषयी अथवा अन्य कोणताही पुरावा नव्हता. दरम्यान, अन्सारी याच्या आईने आपला मुलगा हरविल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. त्यामुळे वानवडी पोलिसांबरोबरच कोंढवा पोलीस याचा तपास करीत होते. त्यात अझान अन्सारी हा लहान असला तरी अनेक गुन्हे करीत होता.

रोशन अजित सिंग यांची पान टपरी असून अन्सारी याने त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर टपरी जाळू अशी धमकी दिली होती. सतिश गायकवाड यालाही अन्सारीविषयी राग होता. त्यातून रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अशोका म्युज समोरुन दुचाकीवरुन त्याला पुण्यधाम रोडने महंमदवाडी येथून गणेशनगर मैदान येथे नेले. तेथे सतिश गायकवाड, अजय गायकवाड, श्रीकांत साठे, अक्षय जाधव हे चौघे आले. त्या सर्वांनी अन्सारी याला लक्ष्मी पार्क जंगल परिसरात नेले. तेथे दारु पाजून त्याच्या डोक्यात व चेहर्‍यावर दगड मारुन खुन केला होता. त्यातील सतिश गायकवाड हा फरार आहे.

या खुनामध्ये कोणतेही धागे दोरे नव्हते. अन्सासी याला दोघे जण दुचाकीवरुन घेऊन जात असताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. परंतु त्यावरील नंबरप्लेट दिसत नव्हती. अशावेळी पोलीस शिपाई किशोर वळे यांना त्यांच्या बातमीदाराने अन्सारीला ज्या गाडीवरुन नेले होते. ती गाडी साई मेडिकलसमोर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही गाडीची तपासणी केल्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दुचाकीवर श्री हे स्टिकर याही दुचाकीवर असल्याने ही गुन्ह्यातील गाडी असल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकीला नंबरप्लेट नव्हते. ती रोशन अजितसिंग याच्या घराबाहेर उभी असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, सुशिल धिवार , संतोष नाईक, सुशिल पवार, निलेश वणवे ,किरण मोरे , उमाकांत स्वामी, गणेश आगम, सुरेश भापकर , अमित साळुंखे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, यांनी ही कामगिरी केली.