Pune : एन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार

पुणे : वृत्त संस्था – शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एन. के. साम्राज्य ग्रुपचा म्होरक्या निलेश ऊर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीत जाऊन मुसक्या आवळल्या आहेत.
याप्रकरणातील एन. के. साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतीश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम उर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप यांना पकडले आहे. मात्र, जानेवारीमध्ये ही घटना घडल्यानंतर एन. के. साम्राज्य ग्रुपचा म्होरक्या निलेश कुर्लप हा फरार होता. दरम्यान या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

निलेश कुर्लप याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुर्लप याच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहायक निरीक्षक सचिन काळे, पोलीस नाईक राजु मोमीन, अजित भुजबळ, गुरु जाधव, मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.

या घटनेनंतर निलेश कुर्लप हा दिल्ली येथे लपून बसला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानुसार या विशेष पथकाने दिल्लीत जाऊन निलेश कुर्लप याला पकडून पुण्यात आले आहे. अधिक तपासासाठी त्याला शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निलेश कुर्लप याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारच्या ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. निलेश हा २०१० पासून शिरुर परिसरात आपली दहशत निर्माण करीत आहेत.

प्रविण गोकुळ गव्हाणे हा गोपाळ यादव याचा खुन करणार असल्याचा समज करुन घेऊन एन. के. साम्राज्य ग्रुपचे वर्चस्व वाढविण्याकरीता गव्हाणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कट केला होता. तशी सुपारी दिली होती. २६ जानेवारी रोजी शिरुर शहरात सी़ टी़ बोरा कॉलेज रोडवर मोटारसायकलवरुन गव्हाणे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करीत गोळीबार केला. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. उपविभागीय अधिकारी राहुल धस अधिक तपास करीत आहेत.