पुणे, नाशिक, बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; फळबागा उध्वस्त, पिकांचे मोठे नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे, नाशिक, बीड जिल्ह्याला सोमवारी (दि. 22) जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने द्राक्ष, आंबा, गहू, कांदा आदीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी बळीराजा करत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुण्यात आणखी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले आहेत. तर झाडांची ही पडझड झाली आहे. वादळामुळे द्राक्ष, आंबा, काढणीला आलेला गहू व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बीड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, वडवणी आदी तालुक्यात शेतक-यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे ज्वारी-गहू आदी पिक आडवी झाली आहेत. फळ बागाही उध्वस्त झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.