पुण्याच्या लष्कर परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग; 25 दुकाने जळून खाक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट परिसरातील दुकानांना पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत जिवीत हानी झालेली नाही. पण 25 ते 27 दुकाने जळून खाक झाली आहेत.

लष्कर परिसरात शिवाजी मार्केट आहे. मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. विशेषतः मच्छी मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक या दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ फायर गाड्या व जवानांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीत 25 ते 27 दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे.