Pune News : ज्या प्रकरणात क्राईम पीआयच्या रायटर महिलेने लाच घेतली त्याच पीटाच्या गुन्हयात रेस्क्यू करण्यात आलेल्या मुलीचं न्यायालयातून पलायन, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पीटाच्या कारवाईत रेस्क्यू करण्यात आलेल्या मुलींना पोलीस निरीक्षक (गुन्हे) न्यायालयात हजर करण्यासाठी गेल्यानंतर अल्पवयीन मुलगीच न्यायालयातून पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात लाच प्रकरण घडल्यानंतर त्याच गुन्ह्यातील या मुलींना आज न्यायालयात नेण्यात आले होते.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस त्या मुलीचा कसून शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी वेश्याव्यवसायावर छापा टाकला होता. कात्रज परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 4 मुलींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर या मुलींना रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्राईम पीआयच्या रायटर श्रद्धा अकोलकर यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. हा गुन्हा तोच असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान लाच प्रकरण घडल्यानंतर आज स्वतः क्राईम पीआय अर्जुन धोत्रे व त्यांचा स्टाफ या चार मुलींना घेऊन न्यायालयात हजर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक एक अल्पवयीन मुलगी न्यायालयातून पसार झाली. काही क्षणातच हे प्रकरण समोर आल्यानंतर मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तिचा शोध आता युद्ध पातळीवर घेतला जात आहे. पण अद्याप तरी सापडलेली नाही. ही मुलगी कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.