Pune News : हनी ट्रॅपमधून 61 लाखांच्या खंडणीची मागणी, पैसे रोख स्वरुपात आणि मित्राच्या Google Pay ‘द्वारे घेतले, आरोपी गजाआड
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत शहरातील एका बड्या इलेक्ट्रॉनीक्स कंपनीच्या मालकाला बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 20 लाखाची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच आणखी 61 लाख रुपयांची खंडणीची मागणी आरोपीने केली होती. या सराईत खंडणीखोराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. हनी ट्रॅपचा (Honey Trap) हा प्रकार खंडणीविरोधी पथकाने नांदेड सिटी येथील एका हॉटेलात सापळा रचून उघडकीस आणला. न्यायालयाने आरोपीला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती
अविनाश वसंत जाधव (वय-28, रा. चन्द्राई संकल्प फ्लॅट नंबर 206 दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नांदेड सीटीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली होती.
यातील तक्रारदार यांची इलेक्ट्रॉनीक्स कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रॉनीक्स वस्तू बनवून त्याची होलसेल विक्री केली जाते. दरम्यान तक्रारदार यांच्या कंपनीत एक तरुणी नोकरी करीत होती. तिने 2017 मध्ये फिर्यादी यांच्याकडून लग्नासाठी चाळीस हजार रुपये घेतले. मात्र नंतर तिने येथील नोकरी सोडली. त्यानंतर तिचा विवाह आरोपी सोबत झाला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीच्या पत्नीने तक्रारदार यांना फोन करून पती अविनाश हा कारागृहात असल्याचे सांगून दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी मदत स्वरुपात एक लाख रुपये दिले.
आरोपी अविनाश 2018 मध्ये काराहगृहातून बाहेर आल्यानंतर त्याने फिर्यादी यांना फोन करून तुमचे आणि माझ्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. तुम्ही रोज गाडीने फिरता, तुमच्या प्रेमसंबंधाची माहिती तुमच्या पत्नीला येऊन सांगेन व तुमचा संसार उध्वस्त करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत 20 लाखांची खंडणी उकळली. आरोपीने ही खंडणी रोख स्वरुपात आणि मित्राच्या गुगल पे अकाऊंटद्वारे घेतली.
फिर्यादी यांनी एवढे पैसे देऊन देखील आरोपी आविनाश याची पैशांची हाव संपली नाही. त्याने 2 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांना फोन करून तुमच्या विरोधात पत्नीला बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगून तुम्हाला रस्त्यावर आणण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर पैसे देण्यास उशीर केल्याचे म्हणत त्यांच्याकडे 61 लाख रुपयाची खंडणी मागितली. यानंतर तक्रारदार यांनी 17 नोव्हेंबर रोजी गुन्हेत तक्रार केली.
असा रचला सापळा
शुक्रवारी (दि. 18) दुपारी पावणेतीनच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. त्यानंतर फिर्यादी यांनी याची माहिती खंडणीविरोधी पथकाला दिली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने दोन हजारांच्या दोन नोटा आणि बनावट नोटांच्या साह्याने पैशांचे बंडल फिर्यादी यांच्याकडे दिले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीजवळ एका हॉटेलमध्ये आरोपी जाधव याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेतले. आरोपी हॉटेलमध्ये आल्यानंतर फिर्यादी यांच्याकडून खंडणीची रक्कम स्विकारताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपी जाधव याला रंगेहाथ पकडले.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून खंडणी स्वरुपात स्विकारलेले 20 लाख रुपये जप्त करायचे आहेत. त्याने फोन केलेल्या फोनचे रेकॉर्डिंग जप्त करायचे असून व्हाईस सॅम्पल घ्यायचे आहेत. आरोपीने मित्राच्या अकाउंटवरुन पैसे स्विकारले आहेत. त्याने कोणाच्या खात्यावरून पैसे स्विकारले याचा तपास करायचा असल्याचा युक्तीवाद सहायक सरकारी वकिल राजश्री कदम यांनी न्यायालयात केला. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी आरोपीला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, ASI पांडूरंग वांजळे, कर्मचारी अहिवळे, जगदाळे, शिंनगारे यांनी केली.