Pune News : कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांच्या अडचणीत वाढ; हिंजवडीनंतर आता वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या ‘हे’ प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तळोजा कारागृहातून रॉयल एन्ट्री मारणाऱ्या गजानन मारणे याच्या अडचणीत वाढ झाली असून, पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी गजानन मारणे आणि त्याचे साथीदार याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजनान मारणे हा तळोजा कारागृहातून सोमवारी बाहेर आला. त्यानंतर त्याची तळोजा ते पुणे अशी शेकडो गाड्या घेऊन रॉयल इंट्री मारली. पण ही इंट्री त्याला महागत पडली आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर त्याची काल जामिनावर सुटका झाली. पण लागलीच आता दुसरा गुन्हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात शासकीय कामात अडथळा आणला असे कलम टाकले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो आला त्याची इंट्री चांदणी चौकात झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांशी नको अश्या गोष्टी घडल्या आहेत,त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक खटके यांनी सांगितले. दरम्यान, काल रात्री गजा मारणेविरूध्द पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुणे आयुक्तालयातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार असे घडले…

सोमवारी साडे आठ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे पोलिस गुन्ह्याच्या प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. चांदणी चौकात गजा मारणे व त्याचे टोळके विना मास्क मिरवणूक काढत आले. त्याच्यातील संतोष शेलार याला मिरवणुकीच्या परवानगी विषयक विचारणा केली. यावेळी त्याने हाताने पोलिस कर्मचाऱ्याला ढकलून दिले. तर मिरवणूक तशीच सुरू ठेवली व ते कोथरूडच्या दिशेने निघून गेले.