Pune News : कायदा व सुव्यवस्था ! पुण्यात पोलिस प्रथमच सायकलवरून गस्त घालणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रथमच आता पुणे पोलीस कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सायकलवरून गस्त घालणार आहेत. येथे असणाऱ्या छोटछोट्या गल्लीत देखील आता या सायकलच्या माध्यमातून पोलीस पोहचणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. समर्थ पोलीस ठाण्यात आजपासून हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे.
सायकल गस्तीच्या या प्रयोगाचे आज सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेकडून पुणे पोलिसांना या दहा अद्यावत सायकली देण्यात आल्या आहेत.

मध्यवस्तीत छोटछोट्या गल्ल्या आहेत. येथे वाहने घेऊन जाणे कठीण असते. अश्यावेळी एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिसांना पोहचणे शक्य होत नाही. किंवा विनाकारण वेळ लागतो. पण आता या परिसरात पोलीस वेळेत पोहचनार आहेत. तसेच त्यामुळे लवकर मदत देखील मिळणार आहे. आता समर्थ पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालताना या सायकलचा वापर करणार आहे. अद्ययावत अश्या या सायकल असून, तिला सात गिअर आहेत. दिवसा व रात्री ठराविक वेळेत हे पोलीस सायकलवरून गस्त घालणार आहेत. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांना दररोज काही अंतर सायकल चालवणे बंधनकारक आहे. त्याचा फायदा पुणेकरासोबतच पोलिसांना देखील  होणार असून, पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.

पोलीस दलात वाहनांची कमतरता आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अनेक नागरिकांच्या तक्रारी येतात. या सायकलींचा उपयोग अशा ठिकाणी तत्परतेने जाण्यासाठी करता येईल. पोलीस जेव्हा या सायकल वरून गस्त घालत असतील तेव्हा त्यांना युनिफॉर्ममध्ये पाहून होणारे गुन्हे नक्कीच टळतील. जेथे पोलिस दुचाकी अथवा जीप घेऊन पोहोचू शकत नाहीत, अशा भागात पोहचतील. तर पर्यावरणाचा समतोल देखील यामुळे राखला जाईल, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.