Pune News : कर्जाचा हप्ता भरण्यास सांगितल्याने व्यवस्थापकाचाच केला खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करणाऱ्या व्यवस्थापकाचा कर्जदाराने खून केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिंदवणे रस्त्यावर मंगळवारी (दि. 16) दुपारी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी खून केल्यानंतर स्वतः लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे.

रविंद्र प्रकाश वळकुंडे (वय २३, रा. नक्षत्र सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळगाव- मारकटवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वळकुंद्रे बजाज फायनन्स खासगी वित्तीय कंपनीच्या व्यवस्थापक होते.

राहुल लक्ष्मण गाढवे (वय -२३, रा. सध्या चंदनवाडी, बोरीभडक, ता. दौंड, मुळगाव- देवळगाव, ता. परंडा , जि. उस्मानाबाद) याने खून केला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गाढवे खून केल्यानंतर काही वेळात स्वतःहून लोणी काळभोर पोलिसांच्या हवाली झाला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याने कांही महिन्यापूर्वी बजाज फायनन्स वित्तीय कंपनीकडून ९८ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. मात्र, मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे त्याचा रोजगार बुडाला होता. राहुल कर्जाचे हप्ते वेळेवर भरु शकला नव्हता. यामुळे रविंद्र याने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी राहुल याच्या मागे तगादा लावला होता. मंगळवारी राहुल बजाज फायनन्स कंपनीच्या उरुळी कांचन येथील कार्यालयात आला असता, रविंद्र यांने पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली. यावर राहुल याने पैसे नसल्याने, कर्जाचा हप्ता भरण्यास नकार दर्शवला. यावरुनच राहुल व रविंद्र यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर दोघेही वाद घालत, बजाज फायनन्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर आले. त्याही ठिकाणी दोघांची तुतु-मैमै चालू असतानाच, राहुलने खिशात लपवलेल्या तीक्ष्ण हत्याऱ्याने रविंद्र यांच्यावर वार केले. या हल्ल्यामुळे जखमी झालेले रविंद्र रस्त्यावर कोसळले. यावेळी उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावरुन ये-जा करणारे लोक घटनास्थळी जमा झाले. प्रसंगावधान राखत राहुल याने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, नागरीकांनी जखमी रविंद्र यांना उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहित डॉक्टरांनी दिली. त्यानंतर काही वेळातच आरोपी राहुल गाढवे हा खूनात वापरलेल्या हत्याऱ्यासह उरुळी कांचन पोलिस चौकीत हजर झाला.

दरम्यान, घटनास्थळी लोणीकाळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधऱी यांनी भेट दिली असून, पुढील तपास पोलिस निरीकक्षक सुरज बंडगर करत आहेत.