Pune News : प्रेमाला अडसर ठरणार्‍या आईचा मुलानेच प्रियसीच्या मदतीने केला खून, लोणिकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कालच जागतिक महिला दिन साजरा झाला; पण पुण्यात आई अन मुलाच्या नात्याला काळिमा फासेल अशी घटना समोर आली असून, प्रेमाला अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच प्रियसीच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्याने आईचा खून हा नांदेडच्या व्यक्तीने केला असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणला.

विशाल राम वंजारी (वय 19, रा. माने वस्ती, वढू खुर्द, हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (वय 26) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत सुशीला राम वंजारी (वय 38) यांचा खून झाला आहे. याप्रकरणी लोणिकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक महिला मृत अवस्थेत पडली असल्याची माहिती लोणिकंद पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुशीला वंजारी या मृत अवस्थेत दिसून आल्या. यावेळी मुलगा विशाल वंजारी हा देखील होता. त्याने पोलिसांना आईला नांदेड येथील शिवा देशमुख या व्यक्तीने पैशाच्या कारणावरून तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्या असल्याची माहिती दिली. प्रथम हा प्रकार खरा मानून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला. पण तपासाला सुरुवात केली. यावेळी खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. पण सांगितलेल्या घटनेवर संशय आला. तर फिर्यादी मुलगा विशाल याच्या जबाबात तफावत आढळली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तसेच पोलीस खाक्या दाखवत चौकशी केली. त्यावेळी मुलगा विशाल वंजारी हाच आरोपी असल्याचे समोर आले. प्रियसीच्या मदतीने खून केला असल्याचे उघडकीस आले.

म्हणून खून…

विशाल वंजारी व नॅन्सी डोंगरे यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सुशीला वंजारी यांचा विरोध होता. तर विशाल हा नेहमी घरातील पैसे चोरायचा. काल देखील त्याने घरातील 15 हजार रुपये चोरले होते. यावरून दोघा मायलेकात कडाक्याचे भांडण झाले होते. याचा राग मुलगा विशाल याला आला होता. त्याने प्रेयसी नॅन्सी हिच्या मदतीने आईचाच खून करण्याचा कट रचला. तर आईवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह घराबाहेरील ओट्याजवळ आणून टाकला तसेच आईचा खून झाल्याची माहिती दिली. खून दुसऱ्याने केला असा बनाव करत पोलिसांची दिशाभूल केली. पण लोणिकंद पोलिसांनी चाणाक्षपणे तपासात त्याचा बनाव उघड आणला.