Pune News : कनार्टकाच्या मंत्र्याला राष्ट्रवादीकडून ‘गेट वेल सूनचा’ सांगावा, प्रवाशांमार्फत पाठविली गुलाबपुष्पे; द्वेषपूर्ण वक्तव्ये बंद करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करून मराठी-कन्नड वाद भडकाविणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी मानसिकदृष्टयाच आजारी पडले आहेत. त्यांना ‘गेट वेल सून’ च्या शुभेच्छा देणारे पत्र आणि गुलाबपुष्प प्रवाशांमार्फत पाठविण्याचे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे करण्यात आले.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटकचे राजकारणी विनाकारण मराठा-कन्नड वाद भडकावित आहेत. सामान्यांचा त्यांना पाठिंबा नाही. त्यामुळे एसटी बसमधून कर्नाटककडे निघालेली प्रवाशांमार्फत सवदी यांच्यासाठी पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांच्यासह विनोद पवार, श्रीनिवास मेखला, नचिकेत साळवी, सचिन राजगुरु, गणेश विटकर, सागर पिलाने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी उपस्थित होते. त्याचबरोबर एसटी बसवरही फलक लावण्यात आले. ‘’मुंबई’ कर्नाटकची कधीच नव्हती; पण ‘कराची ते कारवार’ हा आख्खा टापू मुंबई प्रदेशात होता, हा इतिहास आहे…सुधरा सवदी’, ‘‘ छत्रपती शहाजी राजांची राजधानी बंगळूरु होती, हा इतिहास विसरु नका’, ‘ बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणारच! अशा घोषणा त्यावर लिहिल्या होत्या.

सवदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईवर नजर टाकणारे वक्तव्य आपल्याकडून झाले यातच आपले बुद्धी दारिद्रय दिसले आहे. तरीही त्याची दखल एवढ्याचसाठी घ्यावी लागते कारण तुम्ही आमच्या शेजारी राज्याचे जबाबदार पदाधिकारी आहात. मुंबईला केंद्रशासीत राज्य करण्याच्या फंदात तुम्ही, तुमच्या कर्नाटक किंवा दिल्लीच्या भाजपने न पडलेलेच बरे. कराचीपासून कारवारपर्यंतचा संपूर्ण टापू ‘मुंबई प्रॉव्हिनन्स’ याच नावाने ओळखला जात होता. त्यामुळे कर्नाटकच ‘मुंबई’चा भाग होता. त्याही मागे जायचे तर आजच्या ‘विजयपुर’च्या आणि तेव्हाच्या विजापुरच्या आदिलशाहीला मराठ्यांनी जमीनदोस्त केले. जी आज तुमची राजधानी आहे, ते ‘बंगळुरू’ हे तर आमच्या छत्रपती शिवाजी राजांचे पिता शहाजी राजे यांची जहागिरी होती. आपला कच्चा इतिहास सुधारून घ्या. मुंबईच्या नादाला लागू नका. आहे तो कर्नाटक नीट सांभाळा. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण बेजबाबदार आणि अज्ञानमूलक वक्तव्यांनी मराठी आणि कानडी जनतेची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका. पदाचे भान ठेवा.