Pune News : मंडईतील प्रसिद्ध हॉटेल ‘प्यासा’वर पोलिसांची मोठी कारवाई ! बेकायदा दारु विक्री व हुक्का पार्लर चालविल्यावरुन FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘प्यासा’ हॉटेल आणि हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्तांनी विशेष पथकाच्या माध्यमातून बुधवारी मध्यरात्री कडक कारवाई केली. खडक ठाण्याच्या हद्दीत उपायुक्तांच्या दुसऱ्या मोठ्या कारवाईने मात्र शहरात वेगळीच चर्चा सुरू आहे. यात सव्वा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी हॉटेल ‘प्यासा’चा मनोज शेट्टी याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी तक्रार दिली आहे.

शुक्रवार पेठेत मद्यविक्रीचे प्रसिद्ध असे प्यासा हॉटेल आहे. दरम्यान शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 नंतर निर्बंध आहेत. मात्र त्यानंतर हॉटेल प्यासा येथे हुक्का पार्लर आणि मद्य विक्री केली जात होती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी मध्यरात्री विशेष पथक घेऊन जात याठिकाणी छापेमारी करत कडक कारवाई केली. यावेळी याठिकाणी बार व्यतिरिक्त रोडलगत वेगळे काउंटर लावत विनापरवाना मद्यविक्री करण्यात येत होती. तर अवैधरित्या हुक्का पार्लर देखील दणक्यात सुरू होते.

खडकच्या हद्दीत उपायुक्तांची दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. कारवाईने पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी सांगत असताना स्थानिक लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येते. आता या कारवाईने पुन्हा जोर धरला आहे.