Pune News : रेल्वे प्रवाशाची बॅग लांबविणार्‍या सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पतीसह मिरजला निघालेल्या महिला रेल्वे प्रवाशाची बॅग लांबविणा-या चोरट्याला लोहमार्ग न्यायालयाने एक वर्ष आणि 28 दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. राऊत यांनी हा निकाल दिला.

रविकुमार राजेंद्र राय (वय 25, रा. गुहाटी, आसाम) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रकांत भागचंद्र शहा यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्हाच्या तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एम.डी. आळंदे यांनी केला. खटल्याचे कामकाज सरकारी वकील वामन कोळी यांनी पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजात पोलिस हवालदार राहुल शिंदे आणि बी. ओ. बमनाळीकर यांनी मदत केली. 18 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादी हे त्यांच्यापत्नीसह पुण्यावरून रेल्वेने मिरजला निघाले होते. रेल्वेत बसण्यासाठी ते पुणे स्टेशनवरील दोन नंबरच्या जिन्यावरून उतरत असताना राय यांने फिर्यादी यांच्या पत्नीच्या हातातील व्हील बॅग चोरली होती. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे तपास करून राय याला अटक केली.

मी गरीब असून घरात एकटाच कमावता आहे. तसेच माझ्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मी यापुढे असा कोणताही गुन्हा करणार नाही. त्यामुळे कमीक कमी शिक्षा करावी, अशी विनंती राय याने न्यायालयात केली होती.

अशा घटना प्रवाशांच्या दृष्टीने असुरक्षिततेच्या : न्यायालय

आरोपीवर कुटुंबाची जबाबदारी आहे व तो गरीब आहे म्हणून त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप बदलत नाही. त्याने केलेले कृत्य गुन्हेगारी प्रवृत्ती दर्शवते. प्रत्येक दिवशी लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. अशा प्रकारच्या घटना घडणे हे समाजाप्रती व प्रवाशांच्या दृष्टीने असुरक्षिततेचे आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.