आता वाहनांच्या ‘चॉइस’ नंबरचा ‘ऑफलाइन’ नव्हे तर ‘ऑनलाइन’ पध्दतीने होणार लिलाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आता वाहनांच्या चॉइस नंबरचा (पसंतीचे क्रमांक) ‘ऑनलाइन’ पध्दतीने लिलाव होणार आहे. त्यासाठी आरटीओने (परिवहन कार्यालय) नियमावलीत बदल केले आहेत. नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे चॉइस नंबरची ‘ऑफलाइन’ पध्दत लवकरच बंद होणार आहे.

आरटीओ कार्यालयाने गेल्या दोन वर्षापासुन ‘सारथी’ आणि ‘वाहन’ या कॉम्प्युटराईज्ड सिस्टीमव्दारे वाहनाबद्दलच्या जवळपास सर्वच सेवा ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आरटीओ कार्यालयाशी संबंधित असलेले सर्व कामे नागरिकांना घरबसल्या करता यावीत म्हणुन वाहन चालविण्याचा परवाना, वाहन रजिस्ट्रेशन, योग्यता प्रमाणपत्र, वाहनांवरील कर्जबोजा चढविणे-उतरविणे, सर्व टॅक्स भरणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, वाहन परवाना नूतणीकरण याहून अधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

यासोबतच आता चॉइस नंबरही नागरिकांना ऑनलाइन पध्दतीने घेता यावेत म्हणून एनआयसीकडून कॉम्प्युटराईज्ड सिस्टीमव्दारे यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी आरटीओच्या नियमात काही बदल करणे गरजेचे होते. केवळ नियमावलीत बदल झालेले नाहीत म्हणुन चॉइस नंबर ऑनलाइन उपलब्ध करून देता येत नाही. आता थेट परिवहन आयुक्‍त कार्यालयाने नियमावलीत बदल करण्याचे काम सुरू केले आहे. आगामी काही काळात नियमावलीत बदल होणार असून चॉइस नंबर ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

कशी असणार कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम

* आरटीओच्या वेबसाईटवर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मालिकेतील सर्व क्रमांक (नंबर) दिसणार आहेत.

* वाहन मालकाने ऑनलाइन क्रमांक (गाडीसाठी नंबर) पसंत करून त्याचे शुक्‍ल भरावयाचे आहे.

* एकाच क्रमांकासाठी (नंबरसाठी) अनेकांनी शुल्क भरले असल्यास त्या क्रमांकाचा ऑनलाइन लिलाव होणार आहे.

* सर्वा जास्त बोली जो वाहन मालक लावेल त्यालाच तो क्रमांक मिळणार आहे.

* या संपुर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप राहणार नाही.

चॉइस नंबर म्हणजे काय ?
चॉइस नंबर म्हणजे वाहन मालकाच्या पसंतीचा क्रमांक होय. वाहन मालक त्याला लकी असलेल्या क्रमांकास प्रधान्य देतात. चॉइस नंबर मिळविण्यासाठी काहीजण तर लाखो रूपये देण्याची तयारी दर्शवितात. लाभदायी क्रमांक म्हणून काही नंबरकडे पाहिले जाते. अशा नंबरला अधिक शुल्क भरून घ्यावे लागते, त्यालाच चॉइस नंबर असे संबोधतात.

चॉइस नंबर ऑनलाइन पध्दतीने का ?
चॉइस नंबरच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला वर्षाला जवळपास 25 कोटी रूपयांचा महसूल मिळतो. चॉइस नंबरची सेवा पुरविण्यासाठी आरटीओ कार्यालयाला मोठे मनुष्यबळ खर्ची करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ, मनुष्यबळ द्यावे लागत असल्याने आता चॉइस नंबरची सेवा ही ऑनलाइन पध्दतीने देण्यात येणार आहे.