बनावट सोनं ठेवून Gold लोन, 3 लाखाची फसवणूक करणार्‍याला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मणिपुरम गोल्ड फायनान्स कंपनीत बनवाट सोने ठेवून 3 लाखांचे गोल्डलोन घेऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

निलेश शांताराम सुर्वे (वय ४०, रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संकेत संन्ने (वय २९, रा. नऱ्हे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील एनडीए रस्त्यावर मणिपुरम गोल्ड फायनान्सची शाखा आहे. येथे निलेश याने १६ जून रोजी बनावट सोने देऊन 3 लाख १५ हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतले होते. यावेळी त्याने स्वतः चे नाव देखील खोटे सांगितले. त्यानंतर तो पुन्हा एकदा सोने परत घेण्यासाठी आला होता. पण, तो सोने म घेताच परत गेला.

यादरम्यान फायनान्स कंपनीकडून सोन्याचे ऑडीट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी निलेश याने दिलेले सोने बनावट असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी निलेश हा पुन्हा कंपनीत आला असता फायनान्स कंपनीकडून याची माहिती वारजे पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच सहायक निरीक्षक नितीन बोधे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने बनावट सोने ठेऊन कर्ज घेतल्याचे समोर आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. निलेश याच्यावर यापूर्वी 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. नगर येथे बनावट कागदपत्राचे आधारे त्याने कर्ज घेतल्याचा गुन्हा आहे. निलेश याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.