कोंबडा आरवतो म्हणुन झोप मोड ; ‘त्या’ पुणेकर महिलेकडून पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दररोज पहाटेच्या वेळी कोंबडा आरवत असल्याने झोपमोड होते म्हणून एका पुणेकर महिलेने चक्‍क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. पुणेकर कधी कोणत्या गोष्टीची तक्रार पोलिसांकडे करेल याचा नेम नाही. यापुर्वी एलियन (परग्रहवासी) दिसले म्हणून तर कधी थेट चंद्रावर जमिन खरेदी केल्याचा दावा पुणेकरांकडून करण्यात आला होता. आता कोंबडा आरवल्याने झोपमोड होते म्हणून चक्‍क पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सोमवार पेठेतील ही घटना असून संबंधित महिलेने समर्थ पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रार अर्जामध्ये कोंबडयाची तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करणार्‍या महिलेचे नाव पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. कोंबडयाची तक्रार प्राप्‍त झाल्याने पोलिस देखील कोंबडयाविरूध्द किंवा त्याच्या मालकाविरूध्द कारवाई कराची की नाही यासंदर्भात बुचकळयात पडले आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलिसांनी इतर गंभीर गुन्हयांचा तपास करायचा की कोंबडयाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याचा तपास करायचा हा अशा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपुर्वी कोथरूड परिसरातील एकाने एलियन दिसला होता असा दावा केला होता. पंतप्रधान कार्यालयाने त्या प्रकरणाचा तपास करण्याचा सुचना पोलिसांना दिल्या होत्या तर एका दुसर्‍या प्रकरणात एका महिलेने काही लाख रूपये खर्च करून चंद्रावर जमिन खरेदी केली होती. त्या प्रकरणात फसवणूक झाल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. या दोन्ही घटनेला काही महिने देखील पुर्ण झाले नाही तोवर कोंबडया विरूध्द पोलिसांकडे तक्रार प्राप्‍त झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाली आहे.