Pune : उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने रूग्णाचा मृत्यू, 3 डॉक्टरांविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   उपचार करत असताना हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठेतील हॉस्पिटलमध्ये काम करणारे हे तीन डॉक्टर आहेत.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक चंद्रकांत गोविंद गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. गुलाम अहमद मुर्तुझा खान, डॉ. अमित मुझुमदार, डॉ. फरहान शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. या घटनेत नंदा थोरात (रा. अहमदाबाद) यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात यांना मनक्याचा त्रास असल्यामुळे 29 मे रोजी भवानी पेठेतील जी. एम. बाबुभाई मेमोरिअल हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी त्यांच्यावर तीन डॉक्टर उपचार करत होते. मात्र 5 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी केली जात होती. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रविण थोरात याने खडक पोलिसांकडे डॉक्टरांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता.

खडक पोलिसांनी नंदा थोरात यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला होता. त्याचा अहवाल, जबाब, शवविच्छेदन अहवाल हे ससून हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे चौकशीसाठी पाठविले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा अहवाल समितीने दिला. त्यानंतर खडक पोलिसांनी डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडक पोलिस अधिक करत आहेत.