Pune PMC News | रस्ते सुशोभीकरणासाठी मोठ्या कुंड्या आणि झाडांची खरेदी वादात ! कुंड्या आणि झाडांच्या किंमतीबाबत खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | जी २० परिषदेच्या (G20 Summit Pune) निमित्ताने रस्ते व पुलांवरील सुशोभीकरणासाठी खरेदी करण्यात येणार्‍या लाखो रुपये किंमतीच्या कुंड्या आणि विदेशी प्रजातीच्या शोभीवंत झाडांच्या किंमतींबाबत खातरजमा करण्यात येईल. त्यानंतरच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. उद्यान विभागाच्यावतीने (Pune PMC Garden Department ) सुशोभीकरणासाठी तसेच कुंड्या खरेदीसाठी ‘तुकड्यां’मध्ये काढण्यात आलेल्या निविदांवरून संशयाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी संबधित अधिकार्‍यांची बैठक घेउन ‘कान उघडणी’ केली आहे. (Pune PMC News)

 

पुढील आठवड्यात होणार्‍या जी २० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर फ्लॉवर बेड करणे, झाडांचे ट्रीमींग करणे या कामांचा समावेश आहे. तसेच या मार्गावरील पुलांवर विदेशी प्रजातीची शोभिवंत झाडे असलेल्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. कडक उन्हाळा सुरू असताना दुभाजकांवरील फ्लॉवर बेडचे आयुष्य जेमतेम चार ते पाच दिवसांचे असणार आहे. विशेष असे की १२ ते १४ जून आणि १९ ते २२ जून अशा दोन टप्प्यांत परिषदांच्या बैठका होणार असून फ्लॉवर बेडचे काम १६ जूनपासून सुरू होणार आहे. या कामासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (Pune PMC News)

 

दुसरीकडे एस्टीमेट कमिटीच्या बैठकीची आडकाठी टाळण्यासाठी कुंड्या आणि त्यात लावण्यात येणार्‍या झाडांच्या प्रत्येकी ४९ लाख रुपयांच्या स्वतंत्र निविदा लावल्या आहेत. या क्षेत्रातील जाणकार सांगतात की मोठ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये अगोदरपासून झाडांचे संवर्धन केले जाते. साधारण आठ ते दहा फुटांपर्यंत ही झाडे वाढविली आणि जोपासली जातात. ऐनवेळी कुंड्यांमध्ये मोठी झाडे लावल्यास ती जगावीत यासाठी सुरवातीचे काही आठवडे बारकाईने काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ती कुंड्यांमध्येच वाढविली जातात. परंतू उद्यान विभागाने मात्र कुंड्या आणि झाडांसाठी स्वतंत्र निविदा मागविल्या आहेत. तसेच नदी काठ सुधार योजनेमध्ये नदी पात्रातील विदेशी प्रजातीचे वृक्ष काढण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. यावरून शहरात विविध संस्था , विरोधी पक्ष आणि महापालिकेमध्ये वाद सुरू आहेत. असे असताना पालिका सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्चून विदेशी वृक्ष घेत असल्याने टीका सुरू झाली आहे.

Advt.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, शहरातील काही
व्हीआयपी रस्ते कायमस्वरूपी चांगले दिसावेत यासाठी सुशोभीकरण करण्यात येत आहे.
यामध्ये वॉलपेटींगसोबतच झाडे असलेल्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या कुंड्या आणि त्यामधील झाडांच्या दराबाबत तसेच
उपयोगितेबाबत अधिकची माहिती घेण्यात येईल. यानंतरच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
यासंदर्भाने आज संबधित अधिकार्‍यांची बैठक घेउन त्यांना सूचना दिल्या आहेत.

 

Web Title :  Pune PMC News | The purchase of large pots and trees for beautifying the roads is in dispute!
The purchase decision will be taken only after confirming the price of pots and trees – Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा