‘तो’ विमानाने यायचा अन् चोरी करुन जायचा ! तब्बल 37 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबाद येथून विमानाने येऊन पुण्यासह राज्यातील विविध शहरात चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या “हायप्रोफाईल” चोरट्याने शहरात ८२ चोऱ्यांसह तब्बल १२७ गुन्हे केले आहे, त्यातून तब्बल ३७ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुन्ना उर्फ सलीम कुरैशी (वय ४६, रा.गोवंडी, मुंबई, मूळ रा. हैद्रबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबरोबरच चोरी केलेला माल विक्री करणाऱ्या शरीफ मोहम्मद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल उर्फ अशोक गोविन्द प्रधान, अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभु कल्लापा नजवंडे (सर्व रा. हैद्रबाद) यांना ही अटक करण्यात आले आहे.

सलीम हा मुळचा हैद्रबाद येथील रहिवासी आहे. तो विमानाने किंवा त्याच्या आलिशान कारने पुण्यात येत असे. त्यानंतर ईश्वर शिंदवळ यास जोडीला घेऊन शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकांमध्ये चोरी करीत असे. त्यानंतर हैद्राबाद येथे जाऊन तेथील साथीदारांमार्फत सोने-चांदी, अन्य दागिने व वस्तु विक्री करीत असे.

कुरेशीने एकूण १२७ गुन्हे केले आहेत. त्यापैकी पुण्यात ८२ चोरीचे गुन्हे केले, उर्वरित ४७ गुन्हे मुंबई, दिल्ली व हैद्रबाद येथे करीत असे. त्याच्याकडून ८३० ग्रॅम सोने, ६ किलो २७५ ग्रॅम चांदीसह ३७ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.