Pune News : पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला शस्त्रासह अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (pune) ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने उरुळी कांचन येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतुस जप्त केले आहे. सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय-34 रा. ऊरळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे पोलिसांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती. शनिवारी (दि.9) रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ऊरळी कांचन इलाईट चौकात आरोपी कंबरेला गावठी पिस्तुल लावून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विद्यधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांच्या पथकाने केली.