पुण्यातील नाना पेठेत डॉक्टरला ‘मारहाण’ करून हॉस्पीटलची ‘तोडफोड’, दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णावर घरी येऊन उपचार करण्याच्या शुल्कावरून दोघांनी डॉक्टरला मारहाण केली. तर हॉस्पिटलची तोडफोड केल्याचा प्रकार नाना पेठेत घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सतीश सुरेश आहुजा (वय 40) आणि लक्ष्मण खेमदास भंबानी (वय 59, रा. विवेकानंद पार्क सोसायटी, नवीन जिल्हा परिषदेसमोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 65 वर्षीय डॉक्टर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे नाना पेठेत खासगी हॉस्पिटल आहे. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले व नातेवाईकावर घरी जाऊन उपचार करायचे असल्याचे सांगितले. रुग्णाला घरी जाऊन तपासण्यासाठीच्या शुल्काबाबतची त्यांनी आरोपींना माहिती दिली. त्या शुल्कावरून आरोपींनी डॉक्टर सोबत हुज्जत घातली. तसेच, त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढले. त्यावेळी आरोपींनी जाताना हॉस्पिटलच्या दरवाजाची काच फोडून दहा हजार रूपयांचे नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक पी. जी. पलांडे हे करत आहेत.