पुण्यात ‘हाय प्रोफाईल’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, युगांडातील 2 मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील उंड्री परिसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करून युगांडा येथील दोन मुलींची सुटका केली. कोंढवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नाकायांझी आयरिन स्टेकॅन्झी फ्रॅंक (Nakyanzi Irene Sstkyanzi Frank) वय 23 रा. उंड्री, मुळ रा. युगांडा) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातील उंड्री परिसरातील सिटीमॉलच्या पाठिमागे असलेल्या कारगील हाईट्समध्ये चौथ्या मजल्यावर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून खातरजमा केली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे खात्रीशीर सांगितल्यावर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या करावाईमध्ये पोलिसांनी युगांडा येथील 26 आणि 22 वर्षिय मुलींची सुटका केली तर नाकायांझी आयरिन स्टेकॅन्झी फ्रॅंक या महिलेला अटक केली.

अटक केलेली महिला युगांडा येथील मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. पोलिसांनी या कारवाईमध्ये रोख रक्कमेसह इतर वस्तू असा एकूण 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंढवा पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई किरण संपत मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार करत आहेत.