लॉकडाऊन दरम्यान किराणा मालाची वाढीव दराने विक्री करणार्‍यांविरूध्द गुन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आली असून, त्यात जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आली आहे. मात्र, तरीही काही जण याचा फायदा घेऊन आगाऊ रक्कम घेऊन जीवनावश्यक वस्तू विक्री करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन किराणा दुकानांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच जास्त दराने विक्री करत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येरवडा व विश्रांतवाडी परिसरात ही कारवाई केली आहे.

वडगाव शेरी येथील महेश कल्याणी मार्केट येथे नथाराम बाळाराम देवासी आणि विश्रांतवाडी येथे मनोज गर्ग यांच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत.

मात्र याचा फायदा घेऊन काहीजण याकाळात जीवनाश्यक वस्तूंची विक्री करून आर्थिक नफा कमविण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत तक्रारी येत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात पाच ते सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान विश्रांतवाडी येथे एक किराणा दुकानदार जास्त भावाने माल विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येथील मनोज गर्ग याच्यावर कारवाई केली. गर्ग पेढीच्या मनोज गर्गवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वडगाव शेरी येथील महेश कल्याणी मार्केट येथे नथाराम बाळाराम देवासी हा किराणा मालाची जास्त दराने विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर किराणा माल जास्त दराने विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात जास्त दराने किराणा मालाची विक्री करत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.