पुण्यात आता विनाकारण घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून थेट वाहन जप्तीची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्यापासून (आज रात्री 12 पासून) लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर विनाकारण बाहेर पडल्यानंतर थेट वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

कोरोनामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील काही गावात कडक लॉकडाऊन केले आहे. अंमलबजावणी आज रात्रीपासून सुरू होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दूध, औषधे, दवाखाने सुरू राहणार असून, उर्वरित सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांवरून संचार, पदपथावरून वाहन चालविणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रस्त्यांवर फक्त पोलीस…
लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक केली जाणार असून, त्यानुसार पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. रस्त्यांवर जवळपास दीड हजार पोलीस असणार आहेत. तर अनेकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात 120 ठिकाणी नाकाबंदी केली असून, 213 अधिकाऱ्यांसोबतच तबल 1 हजार 352 कर्मचारी तैनात असणार आहेत. त्यासोबतच स्थानिक पोलिस व वाहतूक विभाग देखील पहारा देणार आहेत. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर मोठी कारवाई होणार आहे.

वाहन जप्तीची कारवाई
लॉकडाउनची कडक अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विनाकारण फिरणाऱ्याची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. त्याशिवाय विनामास्क प्रवास, मोटारीसह दुचाकीवर जास्त नागरिकांनी प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.