पुण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका तर दोघे ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात ऑनलाइन ऍस्कॉटींगच्या माध्यमातून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, पुणे पोलिसांनी कारवाई करत यातून तीन महिलांची सुटका केली आहे. तर, दोघांना अटक देखील केली आहे.

संजु उर्फ संजय प्रभाकर औदापुरे (रा. पिंपळे गुरव, मुळ. रा. कर्नाटक) आणि उत्तम जट्टू कांबळे (रा. अंधेरी, मुळ – कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही छुप्या पद्धतीने शहरात अवैध धंदे सुरू आहेत. दरम्यान, मुंबईलाही मागे टाकत पुण्यात वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे बोलले जाते. यात स्पा, ऑनलाइन ऍस्कॉटींग आणि खासगी फ्लॅटवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान, कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण यांना माहिती मिळाली की, काही संकेतस्थळावरून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. त्यानुसार वरिष्ठांना ही बाब सांगण्यात आले. त्यानुसार बनावट ग्राहकाद्वारे याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहकाद्वारे पुणे स्टेशन परिसरातील क्रिस्टल हॉटेलात बोलाविण्यात आले. त्यानुसार येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी येथून एका महिलेची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता आणखी काही संकेतस्थळावरून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आपटे रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलात कारवाईकरून एका महिलेची सुटका केली आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकूण तीन महिलांची सुटका केली आहे.