Pune : पुण्यात कडक लॉकडाऊन असताना देखील सराईत गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच; सराईत गुन्हेगारांसह इतरांचा तिघांवर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात कडक लॉकडाऊन असताना देखील सराईत गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच असल्याचे दिसत असून, टायर फुकट न दिल्याच्या रागातून तिघांवर दोन सराईत गुन्हेगार व त्यांच्या चार साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. वानवडीत हा प्रकार घडला असून, दोघांना अटक केली आहे.

सोडग्या उर्फ अक्षय महेंद्र शिंदे (वय 18) आणि अजय महेंद्र शिंदे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर त्यांच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जावेद अन्सारी (वय 26) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रामटेकडी परिसरात राहतात. त्यांचे वाहनांचे टायर व ट्यूब बदलून देण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी आरोपी हे त्याच्याकडे आले.
तसेच त्यांनी टायर आणि ट्यूब फुकट मागितली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना नकार दिला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तर भांडण सोडवण्यास आलेल्या इरफान याला देखील मारहाण केली. त्यानंतर इरफान सिद्धीकी याच्यावर कोयत्याने वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर दगडफेक करत फिर्यादी यांना मारहाण केली. तर हवेत कोयते फिरवून दहशत माजवत आमच्या नादाला लागला तर एक एकाचे मुडदे पाडू, अशी धमकी दिली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपले घर बंद करून घेतली होती. माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना अटक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.