Pune : व्यवसायिकाला वितरण एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाख रुपयांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सायबर चोरट्यांनी एका व्यवसायिकाला वितरण एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मिलींद कांबळे (वय ४३, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एका नामांकित कंपनीची माहिती दिली. तसेच या कंपनीची वितरण एजन्सी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना चोरट्याने ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. कांबळे यांनी वेळोवेळी अडीच लाख रुपये जमा केले. पण, त्यांना एजन्सी मिळाली नाही. त्यांनी संबंधित मोबाइलवर संपर्क साधला असता तो होत नव्हता. यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करत आहेत.

पादचारी महिलेची वीस हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना औंध परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या तीन दिवसांपूर्वी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास औंधमधील मेडीपॉईंट हॉस्पिटलजवळून जात होत्या. यावेळी पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक मोहन जाधव करत आहेत.