पोलिसांकडून विविध योजनांच्या माहितीसाठी जनजागृती प्रदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलामार्फत नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांच्या माहितीवर जनजागृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुढील महिन्यात 3 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत हे प्रदर्शन पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील पोलीस ओपन ग्राऊंड येथे पार पडणार आहे.

गुजरातमधील मांजलपुर महिला औद्योगिक सहकारी मंडळाच्या वतीने रूरल इंडीया हातमाग व हस्तकला प्रदर्शनही यावेळी भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनादरम्यान पुणे पोलीस दलातर्फे राबविण्यात येणार्‍या कम्युनिटी पोलीस, बडी कॉप, पोलीस काका, सायबर सेल, सेवा कार्यप्रणाली, वाहतूक शाखा व भरोसा सेल, महिला सहाय्यता कक्ष, ज्येष्ठ नागरिक, विशेष बाल सुरक्षा पथक यांच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.

तसेच, येणार्‍या नागरिकांना माहिती देऊन त्यांना माहितीचे पत्रके देण्यात येणार आहेत. तर, पोलीस दलात वापरण्यात येणारे शस्त्र व दारूगोळा याची माहिती व्हावी, यासाठी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.