‘महामेट्रो’ कडून महापालिकेच्या नोटिसेला केराची टोपली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
अमोल येलमार 

महामेट्रोने पिंपरी ते कासारवाडी दरम्यान युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी मेट्रोचे कामकाज पाहणाऱ्या ठेकेदाराने अचानक महापालिकेसमोरील रस्त्यावर काम सुरु करण्यासाठी संरक्षक पत्रे लावले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिके समोरील काम थांबविण्याची नोटीस महापालिकेने महामेट्रोला बजावली आणि गणेशोत्सव होईपर्यंत महापालिका भवनासमोरील ९० मीटरचे काम न करण्याचे सांगण्यात आले. मात्र महापालिकेने दिलेली ही नोटीस झुगारून मेट्रोने काम दामटले आहे. महापालिकेसमोर मेट्रोसाठी खांब उभा करायला खड्डे खोदण्याचे काम सुरु आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वृक्ष विभाग प्रमुखांनी तर महामेट्रोवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले होते तर महामेट्रोने पालिकेने आरोप फेटाळून ते खोटे बोलत असल्याचे धडधडीत सांगितले होते. पालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख साळुंखे यांनी महामेट्रो करारानुसार काम करत नसल्याचा आरोप केला. तसेच काढलेल्या, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात लावण्यात येणारी झाडे लावली नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु असे सांगितले. यावर खुलासा करताना महापालिका आम्हाला जागा देत नाही, आम्ही पुनरोपन केलेले आहे असे मेट्रोच्या प्रशासनाकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले.

पिंपरी चौकात मेट्रोसाठी बीआरटीएसच्या मार्गीकेतून मेट्रोचे तीन पीलर उभे केले गेले. ते रस्त्यापासून सुमारे साडेतीन फूट उंच आणि किमान ८-१० मीटर जमीनी खाली उभे होईपर्यंत महापालिकेला याची कल्पना नव्हती. त्यानंतर आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी काम थांबवण्यास सांगितले. महामेट्रो पहिला, दुसरा आणि तिसऱ्या या तीन टप्प्यात कोठून आणि किती तसेच कोणत्या स्वरूपाचे काम करणार याबाबत महापालिकेला पूर्व कल्पना असते. परंतु, मेट्रोकडून काम सुरू झाल्यावर सांगितले जात नाही. महापालिकेच्या या सर्व नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांचा पुरता चुराडा होत आहे.

मेट्रोकडून कामाला सुरवात झाल्यावर महापालिका प्रशासन अचानक झोपून जागे होते आणि काम थांबवा. हे झालेले काम रद्द करून नव्याने आराखडा करा, बॅरिगेटिंग लावा-काढा असे अनेक प्रकार हे काम सुरू झाल्यावर सुचविले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील काम थांबविण्याची नोटीस महापालिकेने महामेट्रोला बजावली होती. तसेच गणेशोत्सव होईपर्यंत महापालिका भवनासमोरील ९० मीटरचे काम न करण्याचे सांगण्यात आले. मात्र महापालिकेने दिलेल्या नोटीसीला केराची टोपली दाखवत ठेकेदाराकडून काम सुरुच आहे. महापालिकेसमोर मेट्रोसाठी खांब उभा करायला खड्डे खोदण्याचे मोठ मोठ्या यंत्राद्वारे काम सुरु आहे. महापालिकेने नोटीस देऊनही काम सुरु असल्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता, आम्ही काम थांबविण्यासाठी नोटीस दिली असतानाही ठेकेदार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचे प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार आमचे ऐकत नसल्याचेही सांगितले.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31a8ba79-a52e-11e8-aed5-c78a6fe25c3c’]

 |