Pune : महाभयंकर ! 70 वर्षाच्या कोरोना संशयित वृध्दाचा मृत्यू, अंत्यविधी दरम्यान पाय धुवून त्याचे पाणी उपस्थितांना पिण्यास दिलं; FIR दाखल करण्याचे काम सुरू, पुण्याच्या लोणीकाळभोरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, 70 वर्षीय कोरोना संशयित जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला विनंतीकरून मृतदेह घरी आणत अंत्यविधी रितिरिवाजाने पार पडला आहे. भंयकर म्हणजे, त्या जेष्ठ नागरिकाचा अंत्यविधी सुरू असताना त्याचे पायधूवून त्याचे पाणी उपस्थितीना पिण्यास दिल्याची माहिती आहे. आता या सर्व प्रकारची पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शासनाच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 188 व इतर कलमानव्ये नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच पाणी पिल्याबाबत चौकशी सुरू करण्यात येत आहे. तर अंत्यविधीला गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जात असल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे. तसेच ते कोरोना पॉझिटिव्ह होते का याबाबत देखील माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कदमवाकवस्तीत हा प्रकार आज घडला आहे. 70 वर्षीय जेष्ठ नागरीक एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती मृत झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नियमांचे पालन करुन प्रशासन अंत्यविधी केले जातात. मात्र या कोरोना संशयित व्यक्तीच्या नातेवाईकांनी विनंती केल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह ताब्यात दिला. मृतदेह ताब्यात मिळताच शेवटची आंघोळ घालण्याच्या नावाखाली मृतदेह ते राहत असलेल्या ठिकाणी नेला. डझनभर महिलांनी आंघोळ घातली. तर धक्कादायक म्हणजे, नातेवाईकांनी त्यांचे पाय धुतलेले पाणी पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एका कार्यकर्त्यांने याला विरोध केला. पण, त्याला गप्प बसवत हा अंत्यविधी पार पाडला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आता पोलिसांनी पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि इतरांना चौकशीसाठी बोलावले आहे. तर संबंधित रुग्णालयाकडे देखील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान त्या संबंधित कार्यकर्त्याने हा सर्व प्रकार व्हॉटस्अप ग्रुपवर टाकल्यानंतर उघडकीस आला आहे.