पुण्यातील नरपतगिरी चौकात तरूणांना लुटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस चौकीपासून काही अंतरावरच दोन तरुणांच्या खिशांमधील मोबाईल नेल्याची घटना समोर आली आहे. नरपतगिरी चौकात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी लालु सिंग (वय 18, रा. मंगळवार पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालु सिंग व त्याचा एक मित्र सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नरपतगिरी चौकात जेवण्यासाठी आले होते. ते हॉटेल शोधत असतानाच दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी अडविले. तसेच, त्यांना धमकावत त्यांचे खिशे तपासून त्यांच्याजवळील मोबाईल चोरून नेले.

दरम्यान, काही अंतरावरच नरपतगिरी पोलीस चौकी आहे. परंतु, पोलिसांना घटनेचा काहीच मागमूस नसल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे शहरात लुटमार आणि चोरी करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहिला मिळत आहे. परंतु, पोलिसांना त्यांचा शोध लागत नसल्याचे दिसत आहे.