घर रंगविण्याच्या बहाण्याने येऊन केले दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घराचे रंगकाम करण्यास लावण्यात पेंटरनेच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली. त्या पेंटरला सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. त्याने पावणे दोन लाखांचे दागिने चोरले होते.

विठ्ठल महादेव माने (वय 35, रा. जंगलवाडी, सातारा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नंदा जगदाळे (वय 52, रा. वडगाव बुद्रूक) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा गृहिणी असून वडगाव बुदू्रक परिसरातील लक्ष्मी स्मृती इमारतीत राहण्यास आहेत. त्यांना घराचे रंगकाम करायचे होते. त्यामुळे त्यांनी माने याला रंगकाम करण्यास सांगितले होते. तो गेल्या काही दिवसांपासून रंगकाम करत होता. शनिवारीही तो काम करण्यास आला. त्यावेळी फिर्यादी या सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेल्या. त्याचवेळी विठ्ठलने कपाटातील पावणेदोन लाखांचे दागिने चोरुन पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. एस. तनपुरे अधिक तपास करीत आहेत.