Pune : …तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंंदिवस वाढत आहे. प्रादुुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 1 मे पर्यंत संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील काही ठिकाणी गर्दी होत असताना दिसते आहे. गर्दी कायम राहिली तर नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन जाहिर करावा लागेल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा जीवाचं राण करून काम करत आहे. त्यांना ना उमेद करू नये असं देखील पवार यावेळी बोलताना म्हणाले.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक आठवडयाला आढावा बैठक घेण्यात येते. त्याप्रमाणे आज पुण्यात सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सर्व विषयांबाबत सखोल चर्चा करून आढावा घेण्यात आला. रूग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांची चर्चा झाली आहे. तसेच रायगडमध्ये असलेल्या जिंदल यांच्या प्लॅन्टमधून देखील राज्याला ऑक्सिजन मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ससूनमधील बेड वाढविण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत मात्र सध्या ससूनच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे चित्र असल्याचे पवार यांनी सांगितले. रेमडेसिवीरबाबत पवार म्हणाले की, प्रत्येक रूग्णाला रेमडेसिवीर देणे गरजेचे नसल्याचं डॉक्टर सांगतात. रेमडेसिवीर देखील राज्यात जास्तीत जास्त उपलब्ध कसे होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुणेकरांनी गेल्या शनिवार-रविवारच्या विकेंड लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक करून पवार यांनी आगामी काळात देखील कुठेही गर्दी करू नये असे आवाहन केले. आगामी काळात वेळावेळी सरकारनं आवाहन करून देखील लोकांनी गर्दी केली तर नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन जाहीर करावा लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.