पुण्यात कोब्राचे विष घेऊन आलेल्या चौघांना अटक, २ कोटीचे विष जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात कोब्रा सापाचे वीष घेऊन आलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनीट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १ लीटर वीष जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात २ कोटी २८ हजार ३०० रुपये किंमत आहे.

हिमांशु तिलक साहू (वय २८, रा. कांकेर, छत्तीसगड), दशरथ निरंजन हलदार (वय ३८, रा. रायपूर, छत्तीसगड), विकास मनोहर भैसारे (वय ३४, रा. आरमोरी, गडचिरोली), महेंद्र रावसाहेब जाधव (वय ३७, अंबड रोड, जालना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर सहायक पोलिस निरीक्षक अनिल पांडुरंग ऊसूलकर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरात चारजण कोब्रा सापाचे वीष विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट २ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडून १ लीटर कोब्रा सापाचे वीष जप्त करणअयात आले आहे.

त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वीष कोठून आणले? ते वीष कोणाला विकणार आहेत? यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळी आहे का ? याचा तपास करण्यासाठी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर न्यायालयाने ही १ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करत आहेत.