Pune : भारती विद्यापीठ आणि हडपसर परिसरात झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकींचे हे अपघात घडले असून, भारती विद्यापीठ व हडपसर परिसरात या घटना घडल्या आहेत.
सुनील यशवंत कांबळे (वय 32, रा. पी.एम.टी कॉलनी, टिंबर मार्केट) यांचा भारती विद्यापीठ परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. याबाबत विकी कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मोपेड दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकी कांबळे व सुनील कांबळे हे जुना कात्रज घाटातून दुचाकीवर जात होते. यावेळी भरधाव वेगात समोरून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सुनील कांबळे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात एक्टिवा दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसरी घटना हडपसर परिसरात झाली असून, यामध्ये पांडुरंग गायकवाड (वय 50) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात सुधाकर कमलाकर डांगे (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पांडुरंग गायकवाड हे शेवाळेवाडी येथील सिंपलसिटी समोरून देवपूजेसाठी फुले आणण्यासाठी पायी जात होते. यावेळी भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.