Pune : अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याची धमकी; 50 लाखाची खंडणी मागणार्‍या प्रियदर्शनी निकाळजेला गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची पुतणी असल्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगार महिलेला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. गेले काही दिवस ती फरार होती.

प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील तक्रारदार यांना तुमची पत्नी व मेव्हणी यांनी तुमच्याविरोधात तक्रार दिली आहे. मी एका राजकिय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. तसेच, स्वतः गँगस्टर छोटा राजनची पुतणी असून आमचा डीएनए देखील एक आहे, असे तिने खंडणी मागत असताना धमकावले होते. दरम्यान, लष्कर भागात एकाला निकाळजे आणि इतरांनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार दिली होती. यानंतर पथकाने 25 लाख रुपयांची खंडणी घेत असताना धीरज साबळे याला रंगेहात पकडले होते. तसेच, तर मंदार वाईकर याला अटक केली होती. मात्र, यानंतर प्रियदर्शनी ही पसार झाकी होती. गेली काही दिवस पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र ती पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होती.

या दरम्यान खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सचिन अहिवळे यांना प्रियदर्शनी ही वानवडी परिसरात आली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, संपत अवचरे, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, राहुल उत्तरकर, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, आशा काळेकर यांच्या पथकाने केली आहे.