Pune : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेजमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विज्ञान विद्यापीठाची शिफारस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या माध्यमातून परंतू स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर सुरू करण्यात येणार्‍या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेज ऍन्ड टिचिंग हॉस्पीटले येत्या अर्थात २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यास नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिफारस केली आहे. साधारण पुढीलवर्षी जूनमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने महापालिकेपुढे यासाठी केंद्र व राज्य शासनाची अंतिम मान्यता व सुविधा निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहाणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २०१७-१८ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष असताना मेडीकल कॉलेजची संकल्पना मांडली होती. पुढे तिचा पाठपुरावा केला. महापालिका प्रशासशनानेही डॉ. नायडू रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय आणि स्व. बाबूराव सणस शाळेतील जागेचा यासाठी संयुक्त विचार करून कॉलेज उभारणीसाठी प्रयत्न सुरू केला. विशेष असे की यासाठी एक सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली. तिच्याच मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या माध्यमातून हे कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अवघ्या पाच दिवसांपुर्वी महापालिका आणि मेडीकल एज्युकेशन ट्रस्टची रितसर नोंदणीही करण्यात आली आहे. तर काही आठवड्यांपुर्वी बाबूराव सणस कन्या शाळेमध्ये वर्गखोल्या बांधण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत मंजूरही करण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेने ६ नोव्हेंबरला प्रस्ताव परिपूर्ण करून मान्यतेसाठी नाशिकस्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला होता. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या प्रस्तावाला आज मान्यता दिली आहे. आगामी शैक्षणिक वर्ष अर्थात २०२२-२३ पासून १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाकडे शिफारस केली आहे. ही शिफारस करताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महापालिकेने ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या या महाविद्यालयासंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावावरून फक्त शिफारस केली आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक सोयी, सुविधा व अन्य आवश्यक बाबींची प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. याबाबत भविष्यात कोणतेही न्यायालयीन प्रकरण अथवा वाद उदभवल्यास महाविद्यालय व महापालिका जबाबदार राहील. तसेच महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास केंद्र शासन व राज्य शासनाचा जीआर, विद्यापीठाचे पहिल्या वेळेचे संलग्नीकरण प्राप्त झाल्याशिवाय विद्यार्थी प्रवेश देता येणार नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे.

असे असेल मेडीकल कॉलेज

* महापालिकेच्या जागेवर पुणे म्युनिसपल कॉर्पोरेशन- मेडीकल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमांतून कॉलेजचे संचलन.

* महापौर ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष राहातील. गटनेते ट्रस्टी.

* नायडू हॉस्पीटल व आवारातील जागा, कमला नेहरू हॉस्पीटल व स्व. बाबूराव सणस कन्याशाळेची इमारत ट्रस्टच्या नावे ट्रान्सफर करण्यात आली. यासाठी १ कोटी ९२ लाखांचे मुद्रांत शुल्क महापालिकेने अदा केले.

* कॉलेज उभारणीची प्रक्रिया करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती. १४ कोटी रुपये फि देण्यात येणार.

* कॉलेज उभारण्यासाठी महापालिका ६२२ कोटी रुपये खर्च करणार. सर्वसाधारण सभेने ७२ ब (अधिकचा खर्च करण्यास मान्यता) या नियमानुसार प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, राज्य शासनाने अधिकचा खर्च करायचा झाल्यास शासनाची मान्यता आवश्यक असल्याची अट घातली आहे.

* २०२२-२३ पासून कॉलेज सुरू करायचे झाल्यास शिक्षक व अन्य स्टाफची नियुक्ती, विद्यार्थ्यासाठी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, मुला- मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मेस आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार.

* ट्रस्टच्या माध्यमातून कॉलेज उभारण्यात येणार असल्याने देणग्या स्वीकारण्याची मुभा राहाणार आहे.

 

मेडीकल कॉलेज उभारणीसाठी महापालिका ६२२ कोटी रुपये खर्च

कॉलेज चालविण्यासाठी डोनेशन व फीच्या माध्यमातून पैसे उभारणार

ट्रस्टच्या माध्यमातून मेडीकल कॉलेजची उभारणी होणार आहे. यासाठी महापालिका ६२२ कोटी रुपये खर्च करणार आहे. कॉलेज उभारणीसाठी सीएसआर व अन्य माध्यमातून देणगी स्वीकारता येणार आहे. विद्यार्थ्यांकडून येणारे डोनेशन आणि फीच्या माध्यमातून कॉलेजचा संपुर्ण खर्च भागविला जाणार आहे. या मेडीकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये रुग्णांवर सीएचएसच्या दरात उपचार होतील. मात्र, महापालिकेची अन्य रुग्णालय तसेच शासकिय रुग्णालयांच्या तुलनेत केस पेपरचे दर अधिकचे राहातील.

– रुबल अग्रवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे.

राष्ट्रीय मेडीकल कौन्सिलच्या मान्यतेनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करणार – डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

पहिल्या शैक्षणिक वर्षी ऍनॉटॉमी, फिजिओलॉजी आणि बायो केमिस्ट्री हे अभ्यासक्रम सुरू केले जातील. यासाठी आवश्यक वर्गखोल्या, शिक्षक व स्टाफची नियुक्ती, ऑफीस अटेन्डन्स, डीन ऑफीस, हॉस्टेलचे काम पुर्ण करावे लागेल. पुढीलवर्षी जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापुर्वी ही संपुर्ण तयारी करावी लागणार आहे. परंतू यासाठी राज्य आणि राष्ट्रीय मेडीकल कौन्सिलकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मेडिकल कौन्सिलची अंतिम मान्यता मिळण्यापुर्वी संबधित विभागाचे अधिकारी कॉलेज आस्थापनेची काटेकोर पाहाणी करतात. त्यानंतरच मान्यता देण्यात येते. कौन्सिलची मान्यता मिळाल्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून मेडीकल कॉलेज सुरू करता येणार आहे. ही मान्यता मिळावी यासाठी प्रशासन गतीने पावले उचलत आहे. यासाठी महापालिकेत स्वंतत्र सेल स्थापन करण्यात आला आहे.

– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.