Pune : राज्यातील महाविकास आघाडीसह विविध संघटना मंगळवारीच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकांना विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.८) पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाविकास आघाडी, पुरोगामी पक्ष व इतर सामाजिक आणि कामगार संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने आज पत्रकार परिषदेत दिली.

कॉंग्रेस भवन येथे आज महाविकास आघाडीतील या तीनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे रघुनाथ कुचिक, अंग मेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे नितीन पवार, माकपचे सरचिटणीस अजित अभ्यंकर, शे.का.प.चे सागर आल्हाट, लोकायतचे निरज जैन, दगडखाण कामगार परिषदेचे बी. एम. रेगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत बधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसह अन्य सामाजिक संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणामधील लाखो शेतक-यांनी दिल्ली येथे मोर्चा काढला आहे. मागील काही दिवसांपासून अगदी गोठवणार्‍या थंडीत कृषी कायदा रद्द करण्यासाठी ठाण मांडलेल्या शेतकर्‍यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकार भांडवलदारांच्या इशार्‍यावर कायदा करीत आहे. शेतकर्‍यांच्या बंदला समाजातील सर्व क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातही हमाल पंचायत, दि पूना मर्चंटस चेंबर्स, पुणे पेट्रोल व डिझेल असोसिएशन, मार्केट यार्ड कामगार युनियन, पुणे व्यापारी संघटना, पीएमपी इंटक व अन्य कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंददरम्यान उद्या सकाळी साडेदहा वाजता टिळक चौकातून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे मोर्चा काढला जाणार आहे, असे निवेदन बैठकीनंतर महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष व उपस्थित संघटनांनी शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या माध्यमांतून प्रसिद्धीला दिले आहे.