Pune : दुर्दैवी ! कोरोनाने आईचा मृत्यू तर मुलीचा सर्पदंशाने, बारामती तालुक्यातील घटना

बारामतीः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने आईचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा संर्पदंशाने मृत्यू झाला. बारामती शहरातील जळोची गावात शनिवारी (दि. 22) सकाळी साडेसातच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मनीषा ठोंबरे (रा. रेडणी, ता. इंदापूर) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसापूर्वी सरूबाई बंडा ढाळे (रा. जळोची) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनीषा या जळोची येथे आल्या होत्या. शनिवारी सकाळी घरातील झाडलोट करताना त्यांना साप चावला. सर्पदंशानंतर त्यांना तत्काळ उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले. त्यांना वाटेत त्रास होऊ लागला.

सर्पदंशावर लागणारे व्हेंटिलेटर बेड वेळेत उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्यांचा सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवण्यात आले. त्यांना 3 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान सर्पदंशानंतर कुटुंबियांना घरात वाँशिंग मशिन जवळ साप आढळला. त्यांनी सर्पमित्र अमोल जाधव यांना पाचारण केले. त्यांनी 3 फुटांच्या नागाला पकडून बारामती वनविभागाच्या ताब्यात दिले. वन कर्मचाऱ्यांनी निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले.