बसमध्ये दागिने चोरी करणार्‍याला विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमटीत मोबाईल हिसकावून नेणाऱ्यांना पकडले असतानाच विमानतळ पोलिसांनी बसमध्ये दागिने चोरणाऱ्या एकास पकडले आहे. तर त्याचे तीन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना टाटा गार्डन ते खराडी बायपास प्रवासात घडली.

विनोद शिवलाल पवार (वय ५२, रा. मुंढवा) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रजोत चौसाळकर (वय ३२, रा. कुर्ला, मुंबई ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजोत मुळचे मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवाशी असून कामानिमित्त ते पत्नीसह खराडीत आले होते. दोन दिवसांपुर्वी प्रजोत आणि त्यांची पत्नी टाटा गार्डन बीआरटी बसस्थानकावरुन बसमध्ये बसले. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. त्याचा फायदा घेत विनोदने प्रजोतच्या गळ्यातील ४४ हजारांच्या सोन्याची चेन हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रजोत यांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रवाशांच्या मदतीने चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. पाटील अधिक तपास करीत आहेत.

बसप्रवासात जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
पीएमपीएमल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने जेष्ठ महिलेच्या हातातील ४५ हजारांची बांगडी कापून नेली. ही घटना काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महानगरपालिका ते वारजे माळवाडी बस प्रवासात घडली. याप्रकरणी जेष्ठ महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम अधिक तपास करीत आहेत.