पुणेकरांना बसची वाट पाहावी लागणार नाही : मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पीएमपीची बस खरेदी ही पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. पुढील वर्षा अखेर पीएमपीच्या बस ताफ्यात साडेतीन हजार बसेस असतील. यामुळे पुणेकरांना बसची वाट पाहावी लागणार नाही, दर ५ मिनिटांच्या आत १ बस प्रवाशांना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. एचसीएमटीआर चे काम जून महिन्यात सुरू झाले पाहिजे असे आदेशही त्यांनी महापौर आणि आयुक्त यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन, इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, स्मार्ट एलेमेंट्स प्रोजेक्टचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. पुणे शहराचा चेहरा बदलतोय असे सांगताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. शहरातील रिंग रोड, एचसीएमटीआर, जायका असे विविध प्रकल्पांचे काम सुरु करण्यास आणि बस खरेदी करण्यास यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी विलंब केला असा आरोपही त्यांनी केला. कामे मार्गी लावण्याऐवजी त्यावर केवळ राजकारणच त्यांनी केले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “हे रखडलेले प्रकल्प भाजप सत्तेवर आल्यानंतर केवळ मार्गावरच आणले नाही तर त्यातील अडचणी दूर केल्या. ते पूर्ण करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कामही सुरू केले आहे” त्यांनी सांगितले.

“शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील काळात सर्वंकष वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी साडेतीन हजार बसेसची आवश्यकता आहे. बस खरेदी पारदर्शी पद्धतीने होत आहे. यावर्षी १००० बसेस पीएमपीच्या ताफ्यात येतील जुन्या ३०० बसेस या भंगारात काढले जातील. आणखी काही बसेस खरेदी करून बसची संख्या पुढील वर्षापर्यंत साडेतीन हजार पर्यंत नेली जाईल यामुळे पाच मिनिटांनी बस पुणेकरांना उपलब्ध असेल. कमी दरात वातानुकूलित बसची सेवा नागरिकांना मिळणार आहे. पुढील काळात स्मार्ट सिटी प्रमाणेच स्मार्ट ट्रांसपोर्टेशन ही संकल्पना राबवली जाईल. कोणती बस किती वाजता येईल बसमध्ये जागा आहे की नाही ? याची माहिती बस थांब्या वरील फलकावर प्रवाशांना मिळेल.

मोबाईल वरील ॲप वर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर नागरिकांना मिळणार आहे”.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्य मंत्री दिलीप कांबळे, आयुक्त सौरव राव, मेट्रो चे ब्रिजेश दिक्षित , स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारि अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us