अवघ्या 5 हजारांसाठी मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – उसनवारीने घेतलेल्या अवघ्या पाच हजारांसाठी मित्राचाच खून करणा-या आरोपीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीस एच. एम. पटवर्धन यांनी बुधवारी (दि. 23) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अनिल वाल्मिकी (28) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने 2015 मध्ये सुधीर सिंग ( 33) या मित्राचा खून करून मृतदेह घरातच ठेवून बाहेरुन कुलूप लावून पलायन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्तकनगरमधील शास्त्रीनगर भागातील रहिवाशी सुधीर सिंग हा 31 जुलै 2015 रोजी सायंकाळी घराबाहेर पडला. परंतू, तो दुस-या दिवशीही घरी परतला नव्हता. त्याच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्याची पत्नी राणी सिंग यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट 2015 रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. याच चौकशीसाठी 2 ऑगस्ट रोजी ती पुन्हा पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी सुधीरचा मित्र अनिल वाल्मीकीही तिथे आला होता. वारंवार उधारीच्या पैशांची मागणी करुनही सुधीरने पाच हजार रुपये न दिल्याने त्याच्या डोक्यात सत्तूरने वार करुन त्याचा खून केल्याची कबूली त्याने त्यावेळी दिली. त्याआधी 31 जुलै रोजी दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर अनिलने सुधीरला वर्तकनगर येथील इमारत क्रमांक 43 मधील तळमजल्यावरील वसतीगृहामधील एका खोलीमध्ये नेले. तिथेच या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अनिलने सुधीरच्या डोक्यावर सत्तूरने वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून अनिल स्वत:च्या घरी निघून गेला होता.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अनिल याला तात्काळ अटक केली. या संपूर्ण प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी न्यायालयात भक्कम पुरावे देऊन खून प्रकरणाचा पाठपुरावा केला. तर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर बुधवारी याप्रकरणी आरोपीला वाल्मिकी याला ठाणे न्यायालयाने 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.