पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे सामान्य नागरिक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथे त्याचे म्हणणे ऐकले जाते, चांगल्या पद्धतीने त्याला वागणूक दिली जाते. ही लोकाभिमुखता दिसून येत असून मागील चार वर्षांत पोलीस विभागात गुणात्मक बदल झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

बजाजनगर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.

नागपूर मध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस दलाचे काम सुलभ व वेगवान झाले आहे. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, गुन्हे तपासणीचा दर, दोष सिद्धीचा दर वाढला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी नागपुरातील पोलीस स्टेशनचे विभाजन केले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले. तर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.