Coronavirus : आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित यांना ‘कोरोना’ची लागण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. इस्लामपूरमध्ये जनता कर्फ्यू लागू असतानाच जिल्ह्यातील पलूस नगरपरिषदेने पाच दिवसांची टाळेबंदी घोषित केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात दोघे जण कोरोना निष्पन्न आढळून आले आहेत. आर.आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि आबांचे भाऊ सुरेश पाटील या दोघांचे अहवाल कोरोना सकारात्मक आले आहेत. तर आमदार सुमन पाटील यांचा अहवाल नकारात्मक आला आहे.

यापूर्वी सुद्धा आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सभाऊ खोत, माजी आमदार संभाजीराव पवार, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. गुरुवारी दुपारी आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि मुलगा रोहित पाटील या दोघांचे अहवाल सकारात्मक प्राप्त झाले असून, दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती ठीक असल्याचं कुटूंबीयांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

तासगाव येथे बुधवारी कोविड उपचार केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात रोहित पाटील सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, रोहित पाटील यांचा अहवाल सकारात्मक आल्याने पालकमंत्र्यांसह कार्यक्रमातील इतरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केलं आहे.