‘या’ प्रकरणी राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चौकीदार चोर है, पक्षाची ही घोषणा न्यायालयाच्या निर्णयाशी चुकून जोडली गेल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. यापूर्वी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, न्यायालयाने ती मान्य केली नव्हती.

राफेलप्रकरणी प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर प्रतिक्रिया देताना आमचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले असून चौकीदार चोर आहे, हे न्यायालयालाही मान्य झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

त्यावर भाजपच्या नेत्या मिनाक्षी लेखी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वप्रथम राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. प्रचार सभेत बोलताना चुकून ते बोलल्याबद्दल दिलगीर असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. मात्र, त्यावर लेखी यांनी ते मान्य केले नाही व त्यांनी काही अटीवर ही दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज त्यांनी तिसरे प्रतिज्ञापत्र सादर करुन बिनशर्त माफी मागितली आहे.

आपण न्यायालयाचा आदर करतो. चौकीदार चोर है ही पक्षाची घोषणा आहे. ती न्यायालयाच्या निर्णयाशी चुकून जोडली गेल्याने बिनशर्त माफी मागत असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.