‘काँग्रेसने मला माझी जागा दाखवली’ : नवज्योतसिंग सिद्धू 

चंदीगढ : वृत्तसंस्था – काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना राहुल गांधींच्या रॅलीमध्ये बोलण्यापासून रोखण्यात आले. पंजाबमधील माेगा येथील राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये सिद्धू यांना रोखण्यात आले त्यानंतर ते नाराज झाले. काँग्रेसने मला माझी जागा दाखवली असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिद्धूही उपस्थित होते. यावेळी सिद्धू यांना भाषण देण्यास मनाई करण्यात आली. यानंतर नाराज झालेले सिद्धू म्हणाले की, “जर मी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये बोलण्यासाठी योग्य नसेन, तर एक प्रवक्ता किंवा प्रचारक म्हणूनही अयोग्य आहे. पुढील काळात मला बोलण्यासाठी बोलावले जाते किंवा नाही, पण या सभेने मला माझी जागा दाखवून दिली आहे” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणुकीसाठी कोण कोण प्रचार करणार याबाबत माहिती नाही असेही त्यांनी सांगितले.
या सभेचे आयोजन मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी केले होते. यावेळी रंधवा म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी भाषणासाठी केवळ 4 जणांची नावे देण्यास सांगितले होते. यानंतर राहुल गांधी यांना कांगडा येथील सभेला जाण्यास उशिर होत आहे, यामुळे जाखड, आशा कुमारी आणि राहुल गांधीच भाषण करतीस असे सांगण्यात आले.”
यापूर्वीही असाच एक प्रकार घडला होता असे म्हणत सिद्धू यांनी तो अनुभवही शेअर केला.  2004 मधील सिद्धू यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, “सुखविंदरसिंग बादल यांच्या सभेमध्येही मला बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बालाकोट हल्ल्यावरून टीका करणार होतो.” दरम्यान,  सुनील जाखड यांनीही सांगितले की, सिद्धूंना भाषण द्यायला परवानगी द्यायला हवी होती.
You might also like