मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – कळंबोली लोखंड व पोलाद बाजार परिसरात असलेल्या रेल्वे यार्डमध्ये मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीशी संपर्क आल्याने झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

राकेश कुमार पांडू असे मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागात फिटरचे काम करत होते.
कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोली या ठिकाणी असलेल्या रेल्वे यार्डात फिटर म्हणून कार्यरत असलेले पांडू हे आज दुपारी यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीची तपासणी करण्यासाठी चढले.

मालगाडीच्या वरुन जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीशी त्यांचा संपर्क आला. त्यामुळे त्यांना जोरदार वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळंबोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास करीत आहेत.