मुंबई, ठाण्यात पावसाचे ‘थैमान’, जनजीवन विस्कळीत ; ‘लेप्टोस्पायरा’पासून खबरदारी घेण्याच्या ‘सूचना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर परिसरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान मांडले आहे. कोयनेसह राज्यातील जवळपास सर्वच धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी पुर आले असून रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसाने मध्य रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत सीएसएमटी ते वाशी रेल्वे सेवा बंद आहे. तसेच कल्याण आणि बदलापूर येथे रेल्वे मार्गावर पाणी आल्याने अंबरनाथपासून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद आहे.

रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सायनच्या गांधी मार्केमधील रस्त्यावर पाणी साचले आहे. ठाण्यात गेल्या २४ तासात तब्बल ३७३ मिमी, कल्याण ३०७ मिमी, उल्हासनगर २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उल्हास नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे कल्याण येथून रेल्वे बंद करण्यात आली आहे. आठ दिवसापूर्वी संपूण बदलापूर पुराच्या तडाख्यात सापडले होते. महालक्ष्मी एक्सप्रेस याच ठिकाणी १७ तास अडकून बसली होती. अनेक घरात पाणी शिरले होते. असंख्य जनावरे पाण्यात बुडून मृत्यु पावले होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच पुन्हा हा पावसाचा तडाखा बसला आहे. नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग उरण फाटा येथे पाण्यात अडकून गाड्या बंद पडल्या आहेत. खारघर सेक्टरमधील महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

‘लेप्टोस्पायरा’पासून खबरदारी घेण्याच्या सूचना

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –