घड्याळाच्या काट्याबरोबर मनसेचं इंजिन धावणार !

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठींबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा देणार असून स्वतंत्र व्यासपीठावरून नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. लोकसभेसंदर्भात ते १९ तारखेला अधिकृत घोषणा करणार आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते आपली भूमिका आणि अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर १३ वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याचा निर्णय मी घेईनच.

परंतु माझा जो निर्णय असेल तो पक्ष हिताचा असेल आणि तो नंतर सांगणार असल्याची घोषणा केली होती. त्यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींवरही सडकून टिका केली होती. मोदींचा उदो उदो करणाऱ्या त्यांनी नमोरुग्ण आहेत. असे ते म्हणाले होते. राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. मात्र स्वतंत्र व्यासपीठावरून त्यांची तोफ नरेंद्र मोदी विरोधात डागणार आहेत. क़ॉंग्रेस राष्ट्रवादीला याचा फायदा होईल असा प्रचार त्यांच्याकडून केला जाणार आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिला आहे. परंतु त्याची अधिकृत घोषणा ते १९ मार्चला एका कार्यकर्ता मेळाव्यात करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.