गोल्डन मॅनच्या खुनातील मुख्य आरोपी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, अनेक अधिकारी झाले क्वारंटाइन

राजस्थान : वृत्तसंस्था –   राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील बिलारा येथे राहणारे वरिष्ठ वकील नारायणसिंह राठोड उर्फ गोल्डन मॅन यांच्या खुनातील मुख्य आरोपी उमेश सोनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आरोपीला पकडल्यानंतर अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याच्या संपर्कात आले होते. आता, त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वजण घाबरून गेले आहेत. विशेष म्हणजे गोल्डन मॅनचा खून करून दीड किलोपेक्षा जास्त सोने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खूनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास करून बिलाडा गावातून तीन आरोपींना अटक केली. यातील मुख्य आरेपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सोजतचे पोलीस उपअधीक्षक हेमंत जाखड, सोजत पोलीस अधिकारी रामेश्वर लाल भाटी, जैतरण पोलीस अधिकारी सुरेश चौधरी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस आणि नागरिकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

तुरुंग प्रशासनाच्या नव्या नियमानुसार कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्यापूर्वी त्याची कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत पालीमध्ये अशी पहिली घटना समोर आली आहे की, आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 12 अधिकाऱ्यांना होम क्वारंटाइन व्हावे लागले.